हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे नैसर्गिक ओढ्यावर अनधिकृत भराव; पूरस्थितीचा धोका वाढला
प्रतिनिधी :- रोहन कानकाटे
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ परिसरात नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह रोखून अनधिकृत विकासकाम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ओढ्यावर भराव टाकणे, मोठे पाईप टाकून भिंत उभारणे तसेच परिसरातील झाडांची बेकायदेशीर कत्तल करून प्लॉटिंगचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महा पोलीस न्यूजचे पत्रकार रोहन पोपट कानकाटे यांनी तहसीलदार व पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी नैसर्गिक ओढ्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओढ्यात मोठे पाईप टाकून त्यावर भिंत बांधण्यात येत असल्याने पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. परिसरात दाट लोकवस्ती असल्याने ओढ्याचे पाणी अडून नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय, हायवेलगत व ओढ्याकाठच्या अनेक झाडांची तोड करण्यात आल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संदर्भात तलाठी व सर्कल कार्यालयाला वेळोवेळी तोंडी तसेच लेखी माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रोहन कानकाटे यांनी दिलेल्या तक्रारीच्या प्रती ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग आणि वन विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित जागेचा तात्काळ पंचनामा करून सखोल चौकशी करावी, ओढ्यावरील अनधिकृत भराव व बांधकाम त्वरित थांबवावे, झाडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासन काय दखल घेते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

