पुण्यातील बिल्डर निलेश कामठे यांनी गृहखरेदीत ६० लाखांची केली फसवणूक; एकाच सदनिकेवर परस्पर कर्ज उचलल्याचा प्रकार उघड
प्रमोद सावंत पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे, दि. ___ : कोंढवा परिसरात गृहखरेदीच्या नावाखाली एका महिलेची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल्डरने सदनिकेचे पूर्ण पैसे घेऊन ताबा दिल्यानंतरही तीच सदनिका दुसऱ्याच्या नावे करून त्यावर बँकांकडून कर्ज उचलल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार खदिजा अब्दुलहुसेन खेडवाला यांनी २०१५ मध्ये ‘निर्माण एन्कॉन डेव्हलपर्स’ या संस्थेच्या ‘निर्माण इस्ट्रेला’ (कोंढवा बुद्रुक) प्रकल्पात फ्लॅट क्रमांक १२०३ खरेदीसाठी बुक केला होता. या सदनिकेसाठी त्यांनी २०१५ ते २०२३ या कालावधीत एकूण ६० लाख रुपये चेक व रोख स्वरूपात अदा केले.
जून २०२३ मध्ये बिल्डरने सदनिकेची चावी तक्रारदार महिलेला दिली; मात्र ‘रेरा’ नोंदणी क्रमांक लॅप्स झाल्याचे कारण देत खरेदीखत नंतर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांनी बँकेचे अधिकारी सदनिकेत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित बिल्डरने तीच सदनिका चंद्रकांत संगणाळे यांच्या नावे करून त्यावर आयसीआयसीआय बँक व धरमपेठ बँक, नागपूर येथून गृहकर्ज घेतल्याचे समोर आले.
दरम्यान, कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकांकडून सदनिका जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, घराबाहेर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी निलेश प्रभाकर कामठे (बिल्डर), दिपमाला काळे (भागीदार) आणि चंद्रकांत संगणाळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचे पती परदेशात असल्याचा फायदा घेत आरोपींनी विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

