पुण्यातील कोंढवा परिसरात खासदार निधीतून बांधलेल्या वाचनालयाचा मदरसा म्हणून वापर?; कोंढव्यात नागरिकाची तक्रार
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– ता. १८ : कोंढवा परिसरातील खासदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या वाचनालयाचा अनधिकृतपणे मदरसा म्हणून वापर होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार असलम इसाक बागवान यांनी कोंढवा पोलीस ठाणे तसेच पुणे महानगरपालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक १९ मधील मन्लिक नगर येथे सन २०२१ मध्ये खासदार स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय उभारllण्यात आले होते. मात्र, सध्या त्या जागेचा मूळ उद्देश बाजूला ठेवून मदरसा चालविण्यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदाराने प्रशासनाकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित जागा कोणत्या अधिकाराने व कोणत्या नियमांनुसार मदरसा चालविण्यासाठी देण्यात आली, जागा भाडेतत्त्वावर दिली असल्यास त्याचा करार व भाडे किती आहे, या वापरासाठी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का, तसेच परवानगीशिवाय वापर होत असल्यास तो शासकीय मालमत्तेवरील अनधिकृत ताबा मानला जाणार नाही का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
या प्रकरणात शासकीय मालमत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत संबंधित कायद्यांनुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याने तक्रार स्वीकारून विषय पुणे महानगरपालिकेशी संबंधित असल्याने आवश्यक ती कायदेशीर चौकशी करण्यात येईल, असे नमूद केले आहे.
दरम्यान, तक्रारदाराने पुणे महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) तसेच परिमंडळ ४ चे उपायुक्त यांनाही तक्रारीच्या प्रती पाठवल्या आहेत. संबंधित जागा सार्वजनिक उद्देशासाठीच वापरण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीमुळे कोंढवा परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाच्या चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणाचे वास्तव चित्र स्पष्ट होणार आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

