पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! रिक्षाचालकाला मारहाण करून जबरी चोरी करणारे तिघे जेरबंद
प्रमोद सावंत पुणे प्रतिनिधी
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस ऑनलाइन ! ऑनलाइन पुणे :- ता. १८ : बिबवेवाडी परिसरात रिक्षा अडवून चालकास मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम आणि रिक्षा लुटणाऱ्या तिघा आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून जबरी चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोर फिर्यादी हे रिक्षातून जात असताना दोन पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या चार जणांनी त्यांची रिक्षा अडवली. आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम तसेच रिक्षा घेऊन आरोपी पसार झाले.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गंगाधाम रोड परिसरातील आईमाता मंदिरामागे सापळा रचून किरण एडबा झोंबाडे (वय २०), पंकज सुभाष पवार (वय २१) आणि कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३०) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर श्री. राहूल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अमंलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहूल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी व दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

