शिवसेवा प्रतिष्ठानच्या 2026 च्या ‘ वंदे मातरम’ रोजनिशीचे दिमाखात प्रकाशन
प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलिस न्यूज! ऑनलाईन:– भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरलेल्या वंदे मातरम या गीताला यंदा 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाली. भारताच्या मातीतला प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर, प्रत्येक स्वप्न हे सर्व या महामंत्राच्या गौरव गाथेत गुंफलेले आहेत.
या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान ने *विशेष स्मृती रोजनिशी (डायरी) 2026* तयार केली. या वैशिष्ट्यपूर्ण रोजनिशी (डायरी) चे *प्रकाशन* रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स( BMCC ) पुणे च्या टाटा सभागृहामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंदे मातरम चे गाढे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस तसेच मध्यरेल्वे पुणे विभागाचे मॅकेनिकल विभागाचे प्रमुख श्री विजय दडस आणि संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद कुलकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेवा प्रतिष्ठानचे श्री. सुनील व्हरांबळे यांनी शिवसेवाच्या स्थापनेपासूनचा कार्य आढावा घेतला. 2017 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेने आजपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग कार्यभरारी घेतली आहे. प्रामुख्याने मावळ तालुक्यातील अतिदुर्गम खेड्यांमध्ये शैक्षणिक सुविधा तसेच आपल्या अनेक वनवासी बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शाळेमध्ये पोहोचण्यासाठी सायकलचे वाटप, चक्रीवादळ व अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या आदिवासी पाड्यांना सर्व सुविधा देण्याचे कार्य तसेच लोणावळ्यामध्ये दोन संस्कार वर्ग, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत इत्यादी क्षेत्रांमध्ये काम चालू आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक देशी फळझाडांचे वाटप व वृक्षारोपण फक्त वृक्ष सांभाळणाऱ्या नागरिकांनाच करण्यात आले.
पवनानगर येथील येळसे या गावातील शाळेमध्ये कंपाउंड व एका मोठ्या हॉलचे काम शिवसेवाच्या माध्यमातून करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शिवसेवा चे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी केली. शिवसेवा प्रतिष्ठानने गेल्या पाच वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यांच्या कार्याची महती नमूद करणाऱ्या रोजनिशी प्रसिद्ध केल्यानंतर यावर्षी वंदे मातरम् या मंत्राने प्रेरित होऊन आपण या वर्षाची रोजनिशी तयार केली आहे असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम चा इतिहास आपल्या वक्तृत्वातून मांडला. हा मंत्र क्रांतीकारकां कडून स्वांतत्र्य लढ्यात सिद्ध झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते श्री. प्रमोद कुलकर्णी यांनी शिवसेवाच्या कार्याचे कौतुक करत असतानाच या काळामध्ये वंदे मातरम चे आणि राष्ट्रप्रथम या संस्काराचे महत्व नमूद केले. आपली पुढची पिढी सुद्धा या मंत्राने प्रेरित होऊन राष्ट्र प्रथम हे ध्येय आत्मसात करेल असे नमूद केले.
या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन मंत्री श्री दादा वेदक यांचीही उपस्थिती होती.स्वर तरंग अकादमीच्या 15 विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या सुमधुर आवाजात राष्ट्रभक्तीपर गीत व पूर्ण वंदे मातरम सादर केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेवाचे अनेक हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संकेत खळदकर आणि श्री गुरुराज कुंभार व यांनी केले. आभार प्रदर्शन सौ मंजिरी भुसारी यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता पूर्ण वंदे मातरम ने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री आशुतोष जोशी,पराग खिरे, अभिजीत चिणे, अश्विन डंके, धनंजय भोईटे , नचिकेत सुरनीस, प्रमोद देशपांडे, प्रल्हाद देशपांडे, मंगेश भुसारी,महेश भुसारी,रितेश गुप्ता, राजेश येवले, राजेश कामठे, नीलाक्षी गोडबोले, अजित घमंडे आदि कार्यकर्ते सहभागी होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

