लोणावळा ग्रामीण पोलिसांचा आदर्श उपक्रम . गणेशोत्सवातील बचतीतून शिवदुर्ग रेस्क्यू टीमला आवश्यक साहित्य वाटप


पुणे प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणावळा:सामाजिक बांधिलकी जपत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आदर्श घालून दिला आहे. सन २०२५ मधील गणेशोत्सवात अनावश्यक खर्च टाळून काटकसरीचा अवलंब केल्यानंतर उरलेल्या ५१ हजार रुपयांच्या रकमेतून शिवदुर्ग रेस्क्यू टीम, लोणावळा यांना रेस्क्यू मोहिमांमध्ये अत्यावश्यक असणारे दोर व विविध साहित्य प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे आपत्कालीन सेवांसाठी नेहमी तत्पर असलेल्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मोठा आधार मिळाला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संपूर्ण स्टाफतर्फे शिल्लक निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उत्सव काळात सुरक्षितता व शिस्त राखण्यासाठी पोलिस कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतानाच समाजकार्यातही पुढाकार घेण्याची ही सकारात्मक परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.
शिवदुर्ग रेस्क्यू टीमला देण्यात आलेल्या साहित्यामध्ये उच्च दर्जाचे रेस्क्यू रोप्स, सुरक्षा उपकरणे तसेच आपत्कालीन स्थितीत उपयोगात येणारे इतर साहित्याचा समावेश आहे. लोणावळा परिसरात पर्यटन हंगाम, गिरीदुर्गांची संख्या तसेच अनपेक्षित दुर्घटनांच्या घटना लक्षात घेता, या साहित्याचे महत्त्व अधिक आहे. रेस्क्यू टीमकडे उपलब्ध संसाधनांमध्ये ही भर पडल्याने बचाव कार्य अधिक वेगाने व सुरक्षितपणे पार पाडता येणार आहे.
हे साहित्य शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या लोणावळा शाखेचे उपाध्यक्ष महेश मसने, सचिव सुनील गायकवाड, संचालक राजेंद्र कडू, तसेच चंद्रकांत गाडे यांच्या स्वाधीन करण्यात आले. साहित्य स्वीकृती वेळी टीमच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे आभार मानत सांगितले की, “हा निर्णय आमच्यासाठी केवळ मदत नव्हे तर कामातील आत्मविश्वास वाढवणारा आहे. पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्थांमधील समन्वय वाढणे हे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे.”
पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असलेल्या रेस्क्यू टीमला मदत करणे ही कर्तव्य भावना आहे. “गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असला तरी अनावश्यक खर्चाला आळा घालून समाजोपयोगी कार्य करणे अधिक महत्त्वाचे,” असे ते म्हणाले.
समाजोपयोगी खर्चाचा आदर्श ठेवत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेला हा उपक्रम प्रशंसनीय ठरत असून, इतर संस्थांनीही अशा सकारात्मक योगदानातून समाजातील बांधिलकी वृद्धिंगत करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!