लोणावळा स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांची धडाडी; नवविवाहित प्रवाशाचा जीव थरारक क्षणी वाचला
प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ऑनलाईन लोणावळा : लोणावळा रेल्वे स्टेशनवर चेन्नई एक्सप्रेस (२२१५९) ट्रेनमध्ये एक गंभीर अपघात टळला. रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) दोन सतर्क अधिकारी—सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मोहन आणि आरक्षक विपीन कुमार—यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नवविवाहित तरुणाचा जीव वाचला. त्यांच्या तत्पर धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३८ वर्षीय प्रवासी श्रृंग गुुप्ता हे पत्नीसमवेत पंढरपूरकडे जात होते. गाडी प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर ते थोडा खाऊ घेण्यासाठी खाली उतरले. मात्र गाडी सुटू लागली तेव्हा ते घाईगडबडीत धावत चढण्याचा प्रयत्न करू लागले. याच दरम्यान त्यांचा तोल गेला आणि पाय घसरून ते ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधील धोकादायक फटीकडे झुकू लागले. क्षणभराचा विलंब झाला असता मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
ही गंभीर परिस्थिती ओळखताच ड्युटीवर तैनात असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मोहन आणि आरक्षक विपीन कुमार यांनी एक क्षणही न दवडता घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी योग्य समन्वय साधत श्रृंग गुुप्ता यांना ट्रेनमध्ये खेचले जाण्यापूर्वीच बाहेर ओढून सुरक्षित प्लॅटफॉर्मवर आणले. त्यांच्या या तत्पर कृतीमुळे श्रृंग गुप्ता यांच्या जीवावर आलेला मोठा धोका टळला.
ही घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या चातुर्य आणि धाडसाचे कौतुक केले. श्रृंग गुुप्ता यांना कोणतीही दुखापत झाली नाही. विवाहास फक्त आठच दिवस झालेले असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि पत्नीने सुटकेचा निश्वास टाकला. घटनेनंतर गुुप्ता यांनी RPF कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले.
लोणावळा स्टेशनवर घडलेली ही घटना रेल्वे सुरक्षा दलाच्या तयारीचे आणि प्रवासी सुरक्षेप्रति असलेल्या बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

