कश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेत मावळ च्या दोन तरुणांची किमया; १६ दिवसात ४,००० किमीचा विक्रमी प्रवास


पुणे प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज !ऑनलाईन पुणे :- तळेगाव दाभाडे:मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे आणि कांब्रे परिसरातील दोन तरुणांनी अवघ्या १६ दिवसांत ४,००० किमी अंतर सायकलवरून पार करत राष्ट्रीय पातळीवर मावळचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. तळेगाव दाभाडे येथील सूरज जाट आणि कांब्रे येथील गणेश गायकवाड या दोन सायकलपटूंनी श्रीनगर ते कन्याकुमारी (K2K) हा कठीण आणि अतिशय आव्हानात्मक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
देशातील सर्वात मोठ्या सायकल राइड मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय, Fit India Movement आणि Dare2Gear Adventures यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. देशभरातील हजारो अर्जदारांमधून कठोर निवडप्रक्रियेनंतर केवळ १५० सायकलपटू या भव्य राइडसाठी निवडण्यात आले. महाराष्ट्रातून निवड झालेल्या काही मोजक्या रायडर्समध्ये सूरज जाट आणि गणेश गायकवाड यांनी स्थान मिळवले व राज्याची मान उंचावली.
ही मोहीम देशाच्या एकात्मतेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राबवण्यात आली. या निमित्ताने देशातील युवकांनी एकत्रितपणे “Ride for Unity” या संदेशाचा प्रसार करण्याचा संकल्प केला.
कठीण भूगोल, हवामान आणि दिवसाला ३०० किमीचा सामना
सूरज आणि गणेश यांनी श्रीनगरच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दक्षिणेकडील प्रखर उष्णतेपर्यंतचा विविध हवामानाचा सामना करत जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा नऊ राज्यांतून मार्गक्रमण केले. उंचसखल रस्ते, हिमवृष्टी, पावसाचे अडथळे, बदलणारे हवामान आणि दिवसाला तब्बल २५० ते ३०० किमी अंतर पार करण्याचे आव्हान त्यांनी धैर्याने पेलले.
या प्रवासातील अनुभूती सांगताना सूरज जाट म्हणाले,
“हा प्रवास टीमवर्क, मानसिक जिद्द आणि राष्ट्रीय अभिमानाचा विजय आहे. शरीर थकतं, पण मन ठाम असेल तर रस्ता कधीच अडथळा ठरत नाही.”
कन्याकुमारीत भव्य समारोप
या मोहिमेचा समारोप १७ नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथे झाला. कांब्रे आणि तळेगाव परिसरातील ग्रामस्थ तसेच स्थानिक सायकलिंग गटांनी या दोन्ही रायडर्सचे “मावळची शान” म्हणून जोरदार स्वागत व अभिनंदन केले.
सायकलिंग क्षेत्रातील हा सिद्धीचा टप्पा केवळ व्यक्तिगत नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर दोन्ही तरुणांनी ४,००० किमीचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!