लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची ३७ लाखांची फसवणूक; भागीदाराच्या नावाखाली पैसे उकळले, अश्लील व्हिडिओची धमकी
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे : – लग्नाचे आमिष दाखवून आणि होंडा शोरूमच्या भागीदारीचे स्वप्न दाखवून एका ५१ वर्षीय व्यक्तीने आणि त्यांच्या कुटुंबियांनी ३१ वर्षीय तरुणाची तब्बल ३७,६५,०१२ रुपये इतक्या रकमेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एवढंच नाही, तर तरुणाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीही उकळण्यात आली.
💰 भागीदारी आणि लग्नाचे आमिष
कात्रज परिसरात राहणारे ऋषिकेश दत्तात्र्य थोरात (वय-३१) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये ऋषिकेश यांच्या आईने आपल्या नवीन गाडीचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवले होते. ते स्टेटस पाहून आईच्या ओळखीचे, गावाकडील भावकीतील कैलास रामचंद्र माने (वय-५१, रा. बावधन, पुणे) यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली.
दि. ०१/०६/२०२४ रोजी कैलास माने, त्यांची पत्नी प्रतिभा, मुली प्रतीक्षा आणि तनिष्का थोरात यांच्या फ्लॅटवर आले. त्यावेळी त्यांनी त्यांची मोठी मुलगी प्रतिक्षा माने हिचे स्थळ ऋषिकेश यांच्यासाठी सुचवले. दोन्ही कुटुंबांची संमती झाली आणि दिवाळीत बैठक, तर उन्हाळ्यात लग्न ठरले.
दोन आठवड्यांनंतर कैलास माने यांनी ऋषिकेश यांना सांगितले की, त्यांना मुलगा नाही, फक्त दोन मुली आहेत. त्यामुळे त्यांनी ऋषिकेश यांच्याकडे भांडवल असल्यास सोलापूर येथील विताईनगर मंद्रुप येथे होंडा टू-व्हीलर शोरूम भागीदारीत सुरू करण्याची कल्पना मांडली. ऋषिकेश यांनी यास सहमती दर्शवली.
💸 लाखो रुपयांची गुंतवणूक आणि फसवणूक
या भागीदारीच्या नावाखाली कैलास माने आणि त्यांची मुलगी प्रतिक्षा यांनी ऋषिकेश यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने मोठी रक्कम घेतली.
शोरूमसाठी दिलेले पैसे (एकुण रु. ३५,००,०००/-): शोरूमच्या जागेचे डिपॉझिट (रु. १ लाख), खुर्च्या-टेबलसाठी, कलरिंगसाठी, गाडी खरेदीसाठी (रु. १० लाख), सब-डिलरचे रजिस्ट्रेशन (रु. ५ लाख) आणि इतर खर्च व गाड्या खरेदीसाठी वेळोवेळी पैसे घेतले.
वैयक्तिक कारणांसाठी दिलेले पैसे (एकुण रु. १,५७,६१२/-): प्रतिक्षा माने हिच्यासाठी सोन्याचे दागिने (रु. ३६,८००/-), प्रतिभा माने यांच्यासाठी मोबाईल (रु. ३०,०००/-), तनिष्का माने हिच्यासाठी लॅपटॉप (रु. ५५,८१२/-) आणि वॉशिंग मशीन घेण्यासाठी पैसे घेतले.
’श्री ऑटो शोरूम’ खात्यावर जमा रक्कम (रु. ३,५४,०००/-): यातील रु. ३,३०,०००/- प्रतिक्षा माने हिने ऋषिकेश यांना न सांगता तिच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर केले.
या व्यवहारादरम्यान, ऋषिकेश यांना संशय आल्याने त्यांनी शोरूममधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, शोरूम अधिकृत नसल्याचे आणि कोणतीही गाडी खरेदी केली नसल्याचे समोर आले.
🚨 घरात घुसखोरी आणि खंडणीची धमकी
दि. ०२/०८/२०२५ रोजी ऋषिकेश परदेशात गेले असताना, ०३/०८/२०२५ रोजी माने कुटुंबाने त्यांच्या फ्लॅटची डुप्लीकेट चावी बनवण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी ऋषिकेश यांना कळवल्यावर त्यांनी मित्रांना फ्लॅटवर पाठवले. त्यावेळी कैलास माने आणि चावी बनवणारा व्यक्ती घरात सापडले. कैलास माने यांनी माफी मागितल्याने ऋषिकेश यांनी तात्काळ पोलिसात तक्रार केली नाही. मात्र, परदेशातून परतल्यावर ऋषिकेश यांना त्यांच्या कपाटातून रोख ५०,०००/- रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले.
दि. १५/०८/२०२५ रोजी माने कुटुंबाला याबद्दल विचारणा केल्यावर कैलास माने यांनी शोरूमच्या पगारासाठी रु. ७२,०००/- आणि वैयक्तिक खर्चासाठी रु. १,५०,०००/- ची मागणी केली. ऋषिकेश यांनी नकार देताच कैलास माने यांनी “तुझे मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ आमच्याकडे आहेत, ते आम्ही व्हायरल करून तुझी बदनामी करू” अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरून ऋषिकेश यांनी दुसऱ्या दिवशी (१६/०८/२०२५) प्रतिक्षा माने हिच्या सांगण्यावरून तिच्या आईच्या जीपे (GPay) खात्यावर रु. ७२,०००/- ट्रान्सफर केले.
त्याच दिवशी, रात्री ऋषिकेश यांच्या फ्लॅटवर कैलास माने, त्यांचे कुटुंब आणि इतर ३ ते ४ अनोळखी पुरुष आले. त्यांनी ऋषिकेश यांना फ्लॅटमध्ये कोंडून शिवीगाळ केली व मारहाण केली. सोसायटीतील लोकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस चौकीत माने कुटुंबाने ‘याचे आमच्या मुलीसोबत लग्न ठरले असताना, आम्ही यांस दुसऱ्या मुलीसोबत पकडले आहे,’ असे पोलिसांना सांगितले. या घटनेनंतरही माने कुटुंबियांकडून ऋषिकेश यांच्या नातेवाईकांना फोन करून बदनामी केली जात आहे.
या सर्व प्रकारानंतर ऋषिकेश थोरात यांनी कैलास रामचंद्र माने, त्यांची पत्नी प्रतिभा, आणि मुली प्रतिक्षा व तनिष्का माने यांच्या विरोधात फसवणूक, घरात प्रवेश, चोरी, खंडणी आणि बदनामीची धमकी दिल्याबद्दल कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
प्रतिक्षा कैलास माने व तनिष्का कैलास माने यांना अटक करण्यात आली आहे तरी वडील कैलास माने व आई प्रतिभा माने हे दोघे ही फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहे. आरोपींना पोलिस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकील सोबत फिर्यादीचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

