प्रेमसंबंधातून वाढले वैर; सुपारी देऊन तरुणावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद….
श्रावणी कामत पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिरगाव : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैराचे अखेर रौद्ररूप धारण झाले आणि सुपारी देऊन एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात विकास बाळासाहेब केदारी (वय ३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेनंतर फक्त काही तासांत तिघा आरोपींना अटक केली आहे.
शिरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी अभिजित संतोष केदारी (२६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२) आणि आकाश अण्णा भोकसे (२६) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेमसंबंधावरूनच कट?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकासचा संशयित अभिजितचा नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होता. हा संबंध अभिजितला मान्य नसल्याने त्याने विकासचा जीव घेण्याचा मनोदय बाळगून कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या कटासाठी अभिजितने नितीन आणि आकाश या दोघांना सुपारी दिली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गोळीबाराची थरारक घटना मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास विकास ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना नितीन व आकाश यांनी त्याला जबरदस्ती अडवले. वाद घालून वातावरण तापवण्यात आल्यावर नितीनने पिस्तुल काढत थेट विकासच्या मानेवर गोळी झाडली. गोळी आरपार गेल्याने विकास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. हल्ल्याचा आवाज होताच आरोपी तात्काळ पळून गेले.
ग्रामस्थांना आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली असता विकास जीवघेण्या अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवले, त्यामुळे त्याचा जीव वाचल्याची प्राथमिक माहिती आहे.
काही तासांत आरोपी गजाआड घटनानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, फोन लोकेशन आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला गेला. या तपासातून अभिजितला रायगड जिल्ह्यातील माथेरानमधून तर नितीन आणि आकाशला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
दोघांवर यापूर्वीही गुन्हे तपासात नितीन आणि आकाश हे ‘सराईत’ गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे.नितीनवर कामशेत पोलिस ठाण्यात खून आणि शस्त्रप्रकरणी गुन्हे नोंद आहेत.आकाशवर चाकण तिहेरी खूनप्रकरणासह ओशिवरा ठाण्यात शस्त्र प्रक्रणी गुन्हे नोंद आहेत.
या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून वाढणारे वैर किती घातक ठरू शकते, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

