रहाटणीत टीडीआर घोटाळा? महापालिकेचा अजब कारभार; जागा एकाची, टीडीआर मात्र दुसऱ्याला !
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- रहाटणी गावठाण याठिकाणी पिपरी चिचवड महानगरपालिका प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून जागा एकाच्या नावावर आणि त्या जागेचा टीडीआर मात्र दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणखी एका टीडीआर घोटाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रहाटणी गावठाण येथील सर्व्हे नंबर ४४/अ/१/३ येथील जागा अतुल भगत यांनी २० ते २५ वर्षापूर्वी विकत घेतली होती. त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेतून वहिवाटकरीत रस्ता दिला. त्याचा कोणताही मोबदला न देता महापालिकेने त्या कच्च्या रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता
ड्रेनेज लाईन व डांबरीकरण केले. याविरोधात भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
२५ वर्षांपूर्वी जागा विकल्यानंतर सर्वोतोपरी अधिकार सध्याचे जागा मालक भगत यांना असतानाही मागील काही महिन्यापूर्वी महापालिका प्रशासनाने जुन्या मूळ मालकाला टीडीआर देण्याचा प्रताप केला. या टीडीआर विरोधात भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने त्यांना केराची टोपली दाखविली. आपल्याच खाजगी मालकीच्या जागेतून गेलेल्या रस्त्याचा टीडीआर आपल्याला मिळावा यासाठी भगत हे महापालिका अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत. अखेर वैतागून त्यांनी सदर रस्ता बंद केला असता अतिक्रमण विभागामार्फत जोर जबरदस्तीने रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे या जागेचा टीडीआर मिळावा व महापालिका प्रशासनाकडून होणारी फरफट बंद व्हावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

