जमिनीच्या वादातून कारने धडक देत तरुणाचा खून उरुळी कांचन परिसरातील भवरापूर येथे घटना; दोघे ताब्यात


दत्ता मस्के पुणे प्रतिनिधी
उरुळी कांचन पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन (ता. हवेली) : जुन्या जमिनीच्या वादातून कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक देत तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी (दि. २) दुपारी भवरापूर येथील साठे वस्ती येथे घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश लक्ष्मण साठे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. भवरापूर, ता. हवेली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय ५८) यांनी फिर्याद दिली असून ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. ५१/२०२६ भा. न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन गट क्र. १०४ संदर्भातील जुन्या वादातून तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्या रागातून अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) व त्याचा साथीदार गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. आष्टापूर, ता. हवेली) यांनी संगनमताने महेश साठे यांना जाणीवपूर्वक ठार मारण्याच्या उद्देशाने कारने धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
आरोपींनी त्यांच्या Hyundai Motor Company निर्मित आय-२० (MH12QY7888) कारने महेश साठे यांच्या हिरो होंडा पॅशन (MH12CJ9551) मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत महेश साठे यांचा मृत्यू झाला.
आरोपी अक्षय साठे याच्याविरुद्ध यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वाहतूक नियमभंगासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!