सोरतापवाडी फाट्यावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू


पुणे, ता. हवेली : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विक्रम दयानंद सुर्यवंशी (रा. बोरीऐंदी, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत उरूळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम सुर्यवंशी हा आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवरून (एमएच २४ बीझेड ८३५६) बोरीऐंदी गावाकडे जात होता. त्यावेळी तो पुणे-सोलापूर महामार्गावरील डिव्हायडर ओलांडून पुणे लेन क्रॉस करत असताना, सोरतापवाडीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने (एमएच १२ वायक्यू ५७९७) त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात विक्रम याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने सिद्दीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी ट्रक चालक सुनिल जगन्नाथ शिंगटे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!