यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र कारागृह विभाग यांचेमध्ये नव्याने झालेल्या सामंजस्य करार..


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- सुधारणा व पुनर्वसन” हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य आहे, त्या अनुषंगाने कारागृहात बंदीस्त असलेले बंदी कारागृहातुन सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बंद्यांकरीता कारागृह विभागाच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवुन त्यांना समाजात ताठ मानेने जीवन जगण्यासाठी सिध्द करणे यासाठी कारागृह विभाग हा नेहमी प्रयत्नशील असतो.

कारागृहात येणारा बंदी हा समाजाचाच एक घटक असतो परंतु कळत नकळत त्याचे हातुन एखादी गुन्हा घडल्यानंतर त्यास कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी बंदीस्त ठेवण्यात येते. बंदी कारागृहात आल्यानंतर त्याचे अर्धवट शिक्षण पुर्ण करण्यासाठी कारागृहातच बंद्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व महाराष्ट्र कारागृह विभाग यांचेमध्ये सन २०१७ मध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला होता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील एकुण २१९९ पुरुष बंदी व २०७ महिला बंदी असे एकुण २८५६ बंद्यांनी पदवी पूर्व परीक्षा, पदविका व पदवीचे शिक्षण प्राप्त केलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचेसोबत झालेल्या सामंजस्य कराराची मुदत संपल्याने दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन कारागृहातील बंद्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गंगा अविरथ सुरु रहावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु मा. श्री संजीव सोनवणे व महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा मा. श्री प्रशांत बुरडे यांच्यामध्ये नव्याने बंदी शिक्षणाकरीता सामंजस्य करार-२०२४ करण्यात आलेला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र कारागृह विभाग यांचेमध्ये नव्याने झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील सर्व कारागृहातील जास्तीत जास्त बंदी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहीत होतील व कारागृह विभागाच्या प्रचलित धोरणानुसार कारागृहात राहुन मुक्त विद्यापीठामार्फत पदवीचे शिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या बंद्यांना ९० दिवसापर्यंत माफी (शिक्षेत सुट) देण्यात येत असुन आतापर्यंत एकुण २१४ बंद्यांना ९० दिवस माफीचा लाभ देण्यात आलेला आहे व या पदवीधर बंद्यांपैकी एकुण १६ बंद्यांनी उच्च पदवी शिक्षणक्रम पुर्ण केल्याने त्यांना पुन्हा ९० दिवसांची माफी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, तळोजा, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह अशा एकुण १० कारागृहात विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मुख्यतः B.A., B.com., M.A., M.Com. हे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शैक्षणिक सुविधा देत असतांना कारागृह विभागील बंद्यांचा देखीलविशेष लक्ष गट म्हणुन समावेश केलेला असल्याने त्यांचे “ज्ञानगंगा घरोघरी” हे ब्रीद या अर्थाने निश्चितच सार्थकी ठरत आहे यात तीळमात्र शंका नाही.

Advertisement

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र कारागृह विभाग यांचेत झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा मा. श्री प्रशांत बुरडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु मा. श्री संजीव सोनवणे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे डॉ जालिंदर सुपेकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ विश्वास गायकवाड, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री सुनिल ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक श्रीमती पल्लवी कदम, उपअधीक्षक श्री भाईदास ढोले, श्री रविंद्र गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री सोमनाथ पाडुळे तसेच अधिकारी, कर्मचारी व बंदी बांधव उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!