पुमा कंपनीचे बनावट टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज, चप्पलचे लोण छोट्या शहरांपर्यंत; साताऱ्यातील दुकानातून अडीच लाखांचे कपडे, शूज, चप्पल जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन सातारा :- दि. १९ : कमी दर्जाचे कपडे, शूज, चप्पल तयार करुन नामांकित ब्रँडच्या लोगोचा वापर करुन त्यांच्या नावाने विकून कॉपीराईट कायद्याचा भंग करण्याचा प्रकार आता छोट्या शहरांपर्यंत जाऊन पोहचला आहे. साताऱ्यातील एका दुकानातून पोलिसांनी पुमा कंपनीचे बनावट टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शुज, चप्पल यांचा २ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत महेंद्र सोहनसिंग देवरा (वय ३६, रा. बाली, जि. पाली, राजस्थान) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिल फॅशन अॅन्ड अॅक्सेसरीज या दुकानाचे मालक मोहन हिंदुराव पवार (वय ४९, रा. पुसे गाव, ता. खटाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवरा हे फिल्ड ऑफिसर असून त्यांच्याकडे पुमा से कंपनीचे कॉपीराईटचे हक्क व ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे संरक्षणाचे हक्क आहेत. सातारा येथील विलासपूर गोडोली भागातील अनिल फॅशन अॅन्ड अॅक्सेसरीज या दुकानामध्ये बनावट उत्पादने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी पोलीस हवालदार सुनिता देखणे, पोलीस अंमलार चेतन वाघमाळे, सागर कदम यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. दुकानावर छापा टाकला असता तेथे पुमा कंपनीचा लोगो असलेले बनावट शुजचे ३५४ नग, ट्रॅक पॅन्टचे ४६ नग, टी शर्टचे १७० नग, चप्पलचे १९४ नग असे २ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा बनावट माल कॉपीराईट कायद्याचा भंग करुन विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार सुनिता देखणे तपास करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

