लोणावळ्यातील टॅक्सीचालकानी बाहेरून आलेल्या ओला–उबेर चालकाला केली मारहाण. मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक


पुणे प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन लोनावळा:वरसोली टोलनाका परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण लोणावळ्यात चांगलीच खळबळ उडाली. शहरात पर्यटकांना सोडण्यासाठी आलेल्या एका ओला–उबेर टॅक्सीचालकावर स्थानिक चालकाने संतापाच्या भरात हल्ला केला. यामध्ये चालकाला मारहाण करून त्याच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ स्वतः आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोहित रामकिसन गुप्ता याला ताब्यात घेत गुन्हा नोंदवला आहे.
नियमांनुसार लोणावळा शहरात ओला–उबेर टॅक्सीना स्थानिक प्रवासी उचलण्यास मनाई आहे. बाहेरून पर्यटकांना घेऊन येणारे चालक फक्त ड्रॉप करून परत जाण्यास मुभा असते. त्यानुसार संबंधित चालकाने पर्यटकांना सोडल्यानंतर वरसोली टोलनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबा घेतला होता. याच वेळी आरोपी रोहित गुप्ता संतापाने हॉटेलमध्ये धडकला आणि “तू इथे का आला?” असा प्रश्न करत त्याने चालकाला शिवीगाळ व मारहाण केली. हाणामारीनंतर आरोपीने बाहेर येऊन टॅक्सीवर दगडफेक केली व वाहनाचे नुकसान केले.
या प्रकरणी तात्याराव भिकन सपकाळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळाचे निरीक्षण करून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे तणाव वाढण्यापासून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले जाते.
लोणावळा–खंडाळा टॅक्सी असोसिएशनचे सल्लागार निखिल कवीश्वर यांनी या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की आरोपी रोहित गुप्ताचा त्यांच्या संघटनेशी काहीही संबंध नाही. “आमच्या असोसिएशनकडून अशा गैरप्रकारांना कधीच प्रोत्साहन दिले जात नाही,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी घटनेचा तीव्र निषेध करत परिसरातील सर्व चालकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. “अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. आरोपीवर योग्य ती कारवाई केली असून तपास सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन हंगामात अशा घटनांमुळे लोणावळ्याच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. सुरक्षित आणि सुयोग्य प्रवास व्यवस्थेसाठी पोलिस आणि प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणीही होत आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!