लोणावळ्यात इतिहास घडला; भांगरवाडी प्रभागातून देविदास कडू बिनविरोध – भाजपाच्या विजयाची पहिली नांदी


प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ऑनलाईन लोनावळा :-लोणावळा शहराच्या राजकीय इतिहासात आज एक अभूतपूर्व क्षण कोरला गेला. भांगरवाडी प्रभाग क्रमांक सातमधून भाजपाचे उमेदवार आणि जनतेचे विश्वासू लोकनेते देविदास भाऊसाहेब कडू हे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी नूतन विवेक घाणेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने देविदास कडू यांचा विजय निश्चित झाला. या प्रभागातून आजवर कोणीही बिनविरोध निवडून आले नव्हते, आणि देविदास कडूंनी हा नवा इतिहास घडवला.
भांगरवाडी प्रभागात भाजपाची भक्कम पकड असली तरी, देविदास कडू यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची, त्यांच्या जनसंपर्कातील आपलेपणा आणि मागील काही वर्षांत केलेली विकासकामे, या सर्वांची दखल घेऊन कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचे धाडस केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा अन्य कोणताही पक्ष—सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र स्पष्ट होते.
नूतन घाणेकर यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून थोडी राजकीय खळबळ माजवली होती. मात्र लोकभावनेची दिशा आणि जनतेचा कडूंवरील अपार विश्वास पाहून त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमध्ये फक्त एकच अर्ज शिल्लक राहिल्याने देविदास कडू यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
लोणावळा शहरात देविदास कडू यांची ओळख ही फक्त राजकारणी म्हणून नाही, तर सतत लोकांसाठी धडपडणाऱ्या एक जनसेवक म्हणून आहे. मागील वर्षभरापासून ते नगराध्यक्ष पदासाठी सज्ज होत होते. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राहिले असते, तर ते कडू यांच्याच वाट्याला येईल, असा जनतेचा कयास होता. मात्र नशिबाच्या खेळीत हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाले. त्यानंतर कडूंनी आपल्या होमवॉर्ड असलेल्या भांगरवाडी प्रभागातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
या प्रभागासाठी भाजपाने सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांचे नाव जाहीर केले होते. पण मोठेपणा दाखवत पुजारी यांनी एक पाऊल मागे घेत कडूंना उमेदवारी देत पक्षातील एकोपा अधिक दृढ केला. त्यानंतर संपूर्ण प्रभागात कडू यांचा प्रचार वेग पकडत गेला.
भाजपाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील विधानसभा निवडणुकीत कडू यांनी दिलेल्या सहकार्याची सार्वजनिक आठवण करून देत, “मी या ठिकाणी उमेदवार देणार नाही,” असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही राजकीय टक्करच उरली नव्हती. फक्त एक अपक्ष अर्ज होता, आणि आज तोही मागे घेण्यात आला.
ही निवडणूक जरी राजकीय असली तरी तिच्या मुळाशी लोणावळ्यातील गेल्या पाच वर्षांच्या विकासाची साक्ष आहे. नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरात अभूतपूर्व विकासकामे पूर्ण झाली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा—प्रत्येक पातळीवर झालेल्या कामांमुळे नागरिकांचा कल भाजपाकडे वाढला आहे. त्याचे पहिलेच प्रतिबिंब आज बिनविरोध विजयाच्या रूपाने दिसले.
अर्ज माघारीनंतर आता शहरातील इतर प्रभागांत खरी निवडणूक रंगू लागणार आहे. आरोप–प्रत्यारोपांची सुरुवात झाली असली, तरी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा एकच—चर्चा आणि प्रचार हा विकासाच्या मुद्द्यांवर व्हावा, वैयक्तिक टीका–टिप्पणीकडे कोणी वळू नये.
भांगरवाडी प्रभागातून मिळालेला हा बिनविरोध विजय भाजपासाठी शुभशकुन मानला जात आहे. देविदास कडू यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि त्यांनी रचलेला इतिहास—लोणावळा शहराच्या आगामी राजकारणासाठी नवी दिशा ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!