आचारसंहितेची पायमल्ली! तळेगावात अनधिकृत फ्लेक्सबाजीचा उघड उघड खेळ
प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरभर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील प्रमुख चौकांमधील अनधिकृत फ्लेक्स हटवून पालिका प्रशासनाने परिसर सुशोभित केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. पण या स्वच्छतेला छेद देणारा एक धक्कादायक प्रकार मराठा क्रांती चौक व खांडगे पेट्रोल पंपा समोर आला आहे.
आचारसंहिता लागू असताना या दोन्ही चौकात भोसरीचे आमदार व मावळ भाजपाचे प्रभारी महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे मोठमोठे फ्लेक्स उघड्यावर झळकत आहेत. हे फ्लेक्स तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता लावले गेल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मग प्रश्न असा — आचारसंहितेचा भंग हा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच लागू असतो का? राजकीय वजनदारांच्या बाबतीत नियम गल्लीतच थांबतात का?
सामान्य नागरिकाने परवानगीशिवाय एखादा छोटासा बॅनर लावला तर त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाते. मग येथे मात्र प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधण्याचे कारण काय? निवडणूक आयोग आणि नगरपरिषद प्रशासन यांना हे फ्लेक्स दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल तळेगावातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सातत्याने उपस्थित करत आहेत.
शहरात आचारसंहितेच्या काळात फ्लेक्सबाजीवर बंदी असताना एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसासाठी सार्वजनिक जागा वापरणे हे नागरिकांच्या डोळ्यात खुपणारे आहे. एका बाजूला स्वच्छतेचे आणि नियमांच्या रेट्याचे ढोल वाजवायचे आणि दुसऱ्या बाजूला अनधिकृत जाहिरातींवर मूकसंमती द्यायची — हा कोणता दुहेरी न्याय?
नियम सर्वांसाठी समान असावेत, हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीवर त्वरित कारवाई करून प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

