द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू


प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- ताजे(मावळ) : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ रविवारी पहाटे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे येणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण अचानक सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला घसरत गेला. याचवेळी मुंबईकडे जाणारी मोटारकार त्याच मार्गावरून येत होती. कंटेनरने अचानक दिशाच बदलल्याने मोटारकारला जोरदार धडक बसली. धडकेत मोटारचे पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.
या अपघातात कंटेनरचालक अनुराग जगदीश गडवा(रा. चक्कर उत्तर प्रदेश) आणि मोटारीतील प्रवासी विवेक सुरेंद्र प्रतापसिंह (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील चालक शुभम शुक्ल (वय ३२, रा. खारघर, नवी मुंबई) तसेच प्रवासी ऋतुराज परमंहस जसवाल (वय ३२, रा. तुर्भे, मुंबई), अवधेश यादव (वय ३३) आणि कंटेनरमधील राहुल राजेंद्र यादव (वय २१, रा. वाराणसी) गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!