उपचारादरम्यान महिलेचा विनयभंग; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पवना नगर:मावळ तालुक्यातील काळे कॉलनी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने तपासणीदरम्यान विनयभंग झाल्याची तक्रार पवनानगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार डॉक्टर सुनील लिंगाजी शहारें (रा. संपदानगरी, सोमवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध विनयभंगासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तसेच स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. उपचार प्रक्रियेचा एक भाग म्हणून डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार होती. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अनुचित वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत नमूद केला आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे ती घाबरली व त्यानंतर तिने नातेवाईकांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ पवनानगर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी डॉक्टर सुनील शहारें यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून प्राथमिक तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील कर्मचारी, वॉर्डमधील इतर रुग्ण तसेच त्या वेळच्या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज असल्यास त्याचीही तपासणी करण्यात येणार आहे. घटना घडली त्या वेळचा संपूर्ण क्रम पोलिसांनी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेषतः महिलांच्या तपासणीदरम्यान वेगळ्या जागा, महिला परिचारिका उपस्थित ठेवण्यासारख्या मूलभूत गोष्टींच्या पालनाबाबत चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, आरोपी डॉक्टर सुनील शहारें यांच्याविरुद्ध पुढील कारवाई प्रक्रियेप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

