कोरेगावमुळ इनामदारवस्ती येथे अत्याधुनिक जिल्हा परिषदेच्या शाळेचे लोकार्पण, माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी बांधली सुसज्ज शाळा…
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोरेगावमुळ इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामदार वस्ती शाळेची सर्व सोयी सुविधा युक्त भव्य दिव्य इमारत ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी ३३ लाख रुपये लोकवर्गणी व शासनाचे २२.५० लाख रुपये असे एकूण मिळून ५५ लाख रुपये खर्च करून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी सुसज्ज शाळा बांधलेली आहे. नुकताच या शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी द्वारकाबाई सोपान सहादू शितोळे यांच्या शुभहस्ते फित कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले. गेली सहा वर्ष ही शाळा कधी झाडाखाली तर कधी पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. कधीकाळी चांगला नावलौकिक मिळवलेली शाळा इमारती आभावी बंद पडते की काय, अशी शंका ग्रामस्थांना वाटत होती. हल्लीच्या महागाईच्या युगात मुलांच्या शिक्षणासाठी २५ -३० हजार रुपये खर्च करणे हे सामान्य पालकांना परवडणारे नव्हते. म्हणून या सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी आधार वाटणारी ही शाळा भविष्यात टिकावी यासाठी नर्सरी उद्योजक सोपान साधू शितोळे यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या भावना लक्षात घेऊन आपली स्वतःची तीन गुंठे जागा शाळेसाठी दान केली. तसेच शाळेचा निधी तुटपुंजा असल्याने बांधकामासाठी दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यामुळे बांधण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले व प्रत्यक्ष शाळा बांधकाम फेब्रुवारी २३ मध्ये सुरू झाले.
शासनाने तीन वर्ग खोल्यांसाठी २२.५० लाख रुपये निधी डीपीसी मधून उपलब्ध करून दिला. हा निधी पुरेसा नसल्याने इनामदार वस्ती येथील या शाळेचे माजी विद्यार्थी दिलीप शितोळे, मनोज शिंदे, शेखर सावंत इनामदार, संतोष शितोळे, धनंजय शितोळे, धनंजय शिंदे, विशाल कानकाटे, योगेश चौधरी, अमोल संभाजी भोसले, महेंद्र शितोळे, डॉ अमोल जेधे, बापू थेऊरकर, राहुल जगताप तसेच कोरेगावमूळ ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश कानकाटे, युवा उद्योजक स्वप्निल सावंत इनामदार, कांचन पतसंस्थेचे संचालक अशोक सावंत इनामदार, निवृत्ती वायकर, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेथे, बापुसाहेब बोधे, वैशाली सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या इमारतीसाठी आपले बहुमोल असे योगदान दिले व लोक वर्गणी करण्याचा दृढ निश्चय केला काही ग्रामस्थांनी वस्तुरूपाने तर काही ग्रामस्थांनी रोख स्वरूपात निधी जमा केला.
आधुनिक इमारती बरोबरच शाळेसाठी किचनरुम, बोअरवेल, टॉयलेट दोन युनिट, रनिंग गार्डन, आर ओ फिल्टर, पेविंग ब्लॉक, साऊंड सिस्टिम, संगणक सुविधा, पंखे, बोलक्या भिंती, ग्रीन बोर्ड, खुर्च्छा टेबल, सुसज्ज मुख्याध्यापक ऑफिस, स्लाइडिंग विंडो, रेलिंग, इन्व्हर्टर इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी देखणी जिल्हा परिषदेची शाळा असू शकते यावर विश्वासच बसणार नाही. अशी एक सुसज्ज इमारत आज या ग्रामस्थांच्या योगदानामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध झाली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

