आंदेकर टोळी पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्कातील दोन तडीपार आरोपींना फरासखाना पोलिसांनी कोयत्यांसह आवळले मुसक्या!
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर वचक ठेवण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान, कुख्यात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरे टोळीतील सक्रिय सदस्यांवर पाळत ठेवून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानुसार कारवाई करत फरासखाना पोलिसांनी मंगळवार पेठेतील कोंबडी पूल परिसरामध्ये सापळा रचून आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन वर्षांसाठी पुणे शहरात येण्यास बंदी घातली असतानाही, आदेशाचे उल्लंघन करून शहरात घातक हत्यारांसह फिरताना या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) सिद्धार्थ प्रभाकर केंगार (वय २४, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर, वडारवाडी, पुणे)
२) सौरभ संजय डोंगरे (वय २६, रा. महालेनगर झोपडपट्टी, दीपबंगला चौक, वडारवाडी, पुणे)
न्यायालयाच्या आदेशाचा भंग आणि कमरेला कोयते!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ९ जून) फरासखाना पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संबंधित दोन संशयित तरुण मंगळवार पेठेतील कोंबडी पूल येथे थांबले आहेत. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
सुरवातीला दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यांना गुन्हे शाखा युनिट-१ येथे आणून अधिक कसून चौकशी केली असता, ते फरासखाना पोलीस ठाण्याच्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील (गु.र.नं. १४९/२०२४) जामीनदार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मा. मोक्का न्यायालयाने ५ एप्रिल २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर करताना दोन वर्षांसाठी पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी (तडीपार) घातली होती. असे असतानाही न्यायालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ते शहरात आले होते. इतकेच नव्हे तर, त्यांची अंगझडती घेतली असता दोघांच्याही कमरेला लोखंडी कोयते मिळून आले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी:
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आरोपी क्र. १ सिद्धार्थ केंगार याच्यावर यापूर्वी २ गुन्हे, तर आरोपी क्र. २ सौरभ डोंगरे याच्यावर एकूण ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या पथकाने केली कामगिरी:
सदरची धडक कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, प्रशांत पालांडे आणि सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

