अर्ध्या तासात चार वर्षाच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश; पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक
पंकेश जाधव संपादक 7020794626
चतुः शृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे: बालेवाडी परिसरात चार वर्षांची मुलगी हरविल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत मुलीला शोधून कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. यामुळे चतुः शृंगी पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.बालेवाडी परिसरात राहणाऱ्या आकांक्षा संदीप गालफाडे या घरकाम करतात. आकांक्षा नेहमीप्रमाणे सकाळी साडे सात वाजता घरातील सर्व कामे आवरून कामावर निघाल्या. त्यावेळी त्यांची ४ वर्षांची मुलगी अनन्या झोपलेली होती.
मात्र, आकांक्षा ११ वाजता घरी आल्यावर त्यांना अनन्या कुठेच दिसली नाही. आसपासच्या घरांमध्ये चौकशी केली असता, कोणालाही काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आकांक्षा यांच्या मनात अनेक विचार येऊ लागल्यावर त्यांनी बालेवाडी पोलीस चौकीत मुलगी हरवल्याची तक्रार केली.
पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील आणि त्यांच्या टीमने त्वरित आकांक्षा गालफाडे राहत असलेल्या परिसरात अनन्याचा शोध सुरू केला. त्यांना जवळपास एक किलोमीटर अंतरावर अनन्या एका दगडावर बसून रडत असल्याचे आढळले. दरम्यान खेळता खेळता इथपर्यंत आल्यानंतर माघारी कसे जायचे माहित नसल्याने आपण इथे बसल्याचे तिने आईला सांगितले.
” समाजात आज विविध घटना घडत आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही चुकीच्या घटना दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे. आज आम्ही ४ वर्षांच्या मुलीला शोधण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. परंतु, पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे”, असे पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर आर पाटील, पोलिस उपनिरीक्षक रहिगुडे, पोलिस अंमलदार साबळे, कपाटे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

