एक मत = दहा ते पंधरा हजार तळेगाव दाभाडे व वडगाव मधे निवडणुकीत नोटांचा महापूर
प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मावळ:तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुकीचा ताप चढला असून ऐन थंडीत पैशाचा पाऊस कोसळू लागला आहे. तळेगावमध्ये एका मताचा दर तब्बल दहा हजारांवर पोहोचल्याची चर्चा असून वडगावात तर हा दर पंधरा हजारांच्या घरात गेल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. गावागावात, वाड्यावस्त्यांवर, चहाच्या टपऱ्यांवर या पैशाच्या खेळाची जोरदार चर्चा रंगली आहे.
निवडणुकीतील ‘खरेदी-विक्री’चे हे बाजारू राजकारण लोकशाहीची धज्जी उडवत असल्याची टीकाही नागरिकांकडून होत आहे. मतदारांच्या घरदारी बोऱ्या भरून नोटा घेऊन जाणाऱ्या एजंटांची लगबग वाढली असून काही ठिकाणी ‘डील’साठी मध्यस्थ बसवल्याची माहिती मिळते. मतांच्या या लिलावात अनेकानी उड्या मारल्याचे, तर काही धनदांडग्या उमेदवारांनी तर बोली वाढवण्यासाठी रात्रभर बैठका घेतल्याचे समजते.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मताला असा दर मिळू लागल्याने प्रामाणिक मतदार त्रस्त आहेत. परंतु मतांचे किमतीचे हे राजकारण कमी होण्याऐवजी उफाळून आल्याने तळेगाव–वडगाव परिसरात निवडणुकीचा माहोल तापला आहे. आगामी निकालात या नोटांच्या पावसाचा परिणाम किती दिसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

